Morachi chincholi

२८ मार्च २०१० रविवार



1. मोराची चिंचोली
2.निघोज येथील रांजण खळगे
3.रांजणगाव येतील महागणपती
4.तुळापुर येथील संभाजी महाराजांचे स्मारक
 
आम्ही ऑफिसमधील चौघा मित्रांनी २८ मार्च रविवार रोजी सहलीस जाण्यास ठरवले.

 मोराची चिचोली पुण्यापासून सुमारे ४० कि मी अंतरावर आहे. तिथे मोर बघण्यासाठी सकाळी लवकर
पोचणे आवश्यक असते.
आम्ही पुण्यातून सकाळी ५ वाजता निघालो. पुणे अहमदनगर महामार्गावर शिक्रापूर जवळ मलठन फाटा आहे तिथून किवा अलीकडे पाबळ फाटा आहे तिथून चिंचोलीत जाता येते. आम्ही डावीकडील मलठन फाट्यावरून आत वळलो. तिथून मोराची चिचोली १८ किमी आहे.
जाताना गणेगाव नावाचे गाव लागते.मोराच्या चिंचोलीत प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा शेतामध्ये मोर दिसू लागले.



एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर दिसल्याने खूप आनंद झाला. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अगदी जवळ हे मोर बिनधास्त फिरत होते. एकदा रस्त्याच्या कडेला एक मोर फिरत होता त्याचा फोटो काढायला माझा एक मित्र कॅमेरा घेऊन गेला. त्याची चाहूल लागल्यामुळे तो मोर भरगच्च पिसारा सांभाळून हवेत जवळ जवळ २० फुट उंच उडाला आणि रस्ता पार करून दुसऱ्या बाजूला गेला. ते दृश्य फारच सुंदर होते. उडताना त्याच्या पंखाचा जो फड-फड आवाज झाला तो आश्चर्यचकित करणारा होता.
त्यानंतर पुढे माउली पर्यटन येथे नाश्ता करण्यासठी गेलो. तिथे श्री जनार्दन थोपटे यांनी मोरांना धान्य देण्याची व्यवस्था केली आहे.
तिथे गेल्यावरही समोर शेतामध्ये बरेच मोर दिसले. थोपटे यांच्या कडे नाश्ता केल्यावर त्यांच्या कडून पुढील मार्गाची माहिती घेतली.
निघोज येथील रांजण खळगे बघण्यासाठी प्रथम टाकळी हाजी येथे जावे लागते. चिंचोलीतून निघोज पर्यंत जाण्याचा मार्ग असा
चिंचोली => मलठन => अमदाबाद => टाकळी हाजी => निघोज
अमदाबाद या गावातून चार रस्ते निघतात , सरळ रस्ता शिरूरला (२० किमी) , डावीकडे टाकळी हाजी (13 किमी ) आणि उजवेकडे रांजणगाव गणपती १० किमी.

टाकळी हाजी ला पोचाण्याधी वाटेत घोड नदी लागते. नदीच्या काठावर एक शिवमंदिर आहे त्याचबरोबर तीन मूर्ती असलेले आणखी एक मंदिर आहे.त्या तीन मूर्ती कोणत्या हे आम्हाला कळले नाही.त्यांचा फोटो या पानावर खाली आपल्याला बघायला मिळेल.


निघोज ला पोचल्यावर देवी मळगंगा हिचे दर्शन घेतले. देवळाबाहेर यज्ञ कुंड आहे. कुकडी नदीचे पत्रातील रांजण खळगे खरोखरच भौगोलिक अविष्कार आहे. हे रांजण खळगे लहान आकारापासून ते मोठ्या आकाराचे आहेत.काही कुंडांमध्ये उतरण्याकरता साखळी सोडली आहे. त्या साखळीचा आधार घेऊन खाली उतरता येते.तिथे थोडावेळ थांबून आणि फोटो काढून आम्ही निघालो.१२ च्या सुमारास पुन्हा अमदाबाद ला पोचलो. आणि तिकडून रांजणगाव गणपतीचे दर्शन घेण्यास निघालो
रांजणगाव येथील श्री महागणपती चे दर्शन घेतले. या गणपतीची कहाणी हि सुरेख आहे. रांजणगाव ला जेवण करून मग तुळापुर येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यास निघालो.
तुळापुर हे पुण्यातून जाताना कोरेगाव भीमा गावाच्या आलीकडे आहे. अलीकडे एक आळंदी फाटा लागतो तो पुढे आळंदी व नाशिक महामार्गावर जातो.फाट्या पासून आत सुमारे ४-५ किमी अंतरावर तुळापुर हे स्थान आहे.







तुळापुर ला त्रिवेणी संगम आहे. इथे इंद्रायणी , भीमा , भामा या तीन नद्या एकत्र येतात. नदीचे अतिशय विशाल असे पत्र इथे बघायला मिळते.नौकायानाची पण सोय आहे.
धर्मवीर संभाजी महाराज व कवी कलश यांना औरंगजेबाने येथेच छळले होते.संभाजी महाराजांचा पुतळा खूप छान आहे.मुरार जगदेव यांनी जीर्णोधार केलेले संगमेश्वर मंदिर येथे आहे. जेवणाची तसेच चहासाठी उपहारगृह आहे.
येथे मुरार जगदेवांनी रुद्रनाथांच्या आज्ञेवरून संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी त्यांनी स्वताची सुवर्णतुला केली, यावरून तुळापुर हे नाव पडले.
तुळापुर हून पुन्हा अहमदनगर महामार्गावर आलो. आणि तिकडून पुणे २०-२५ किमी आहे. सायंकाळी ५:१५ वाजता पुण्यात पोचलो.
अश्याप्रकारे हि सहल अतिशय आनंदात पार पडली.