Tuesday, November 30, 2010

Vasota

१३ १४ नोव्हेम्बर वासोटा नागेश्वर सहल

कोणतीहि इच्छा पुर्ण होण्यास योग्य ती वेळ यावी लागते , या वाक्याचा पुरेपुर अनुभव वासोटा नागेश्वर सहल सहल करतेवेळी आम्हाला आला.यापुर्वी ३-४ वेळा ट्रेकसाठी वासोटा नागेश्वर चे नाव आले होते पण काहीतरी कारणाने उदा. सगळ्याना वेळ नाही,एकच दिवस वेळ आहे;अशा कारणांनी या सुंदर व धाडसी ट्रेक ला फाटा देउन आम्ही पुण्याच्या आसपासचे एक दिवसीय ट्रेक केले.पण या वर्षी ओक्टोबर महीन्यात शिवथरघळ सहलिच्या वेळी अभिजीत , मी व नंदु यांनी वासोटा नागेश्वर करण्याचा बेत पक्का केला.
ट्रेकला अपेक्षीत सर्वांना ई-मेल केले.इंटरनेट वर वासोटा व बामणोली यांचे नकाशे बघुन झाले.हा ट्रेक आधी ज्यांनी केला होता त्यांना फोन करुन सर्व माहीती गोळा केली.ट्रेकच्या आधी आठवडाभर सर्व किराणामाल , वैयक्तिक आणावयाचे सहित्य यांची यादी करुन ई-मेल द्वारे सर्व भीडूं पर्यंत पोहोचवली व ते प्रामाणिक पणे आणण्याचे आवाहन केले.आयत्यावेळि शेपुट घालण्याचे प्रकार थांबावेत म्हणुन रु. २०० सुरक्षा ठेव म्हणुन जमा केले.
१३ तारीख शनिवार रोजी सकाळी ३ वाजता स्वारगेट स्थानकावर भेट्ण्याचे ठरले होते.दुचाकी लावण्यासाठी मामाकडे मुकुंदनगर ला गेलो.बरोबर ४:१५ ला मुंबई - मिरज या गाडीत सातारा ला जाण्यास बसलो.गाडित बसल्यावर तिकिटे काढ्ण्यासाठी मी जेव्हा विचारले तेव्हा मागुन १० असा आवाज आला.मी त्याप्रमाणे १० तिकिटे काढली पण वाह्काला संशय आला व त्याने पुन्हा गणती केली तेव्हा ११ मुले आढळली. य़ा प्रकाराने मी शरमेने गूमान ११ व्या मुलाचे पैसे दिले.

साधारण ६:२० वाजता सातारा येथे पोचलो.बामणोली ला जाणारी एस टि ६:०० वाजताच गेली असे कळ्ले.सातारा राजवाडा येथुन वडाप ची गाडी मिळेल असे कळाले त्यामुळे राजवाडा येथे आलो.सातारा व बामणोली हे अंतर ३५ किमी आहे.वडाप चा चालक रु ७०० म्हणाला.साहजिकच हि रक्कम सर्वांना अमान्य होती.शेवटि तीन चार ठिकाणी चोकशी केल्यावर ’वाट पाहिन पण एस टि नेच जाइन’ या विचाराने ८ च्या एस टि ने जाण्याचे ठरले.
बामणोली ला ’शिटे’ फ़ार नसल्याने बर्याचदा एस टि रद्द होते हे कंट्रोलर कडुन ऐकल्यावर फ़ार दु:ख झाले. कंट्रोलर च्या अक्षरश: हाता पाया पडुन ८.०० चि एस टि पाठविण्यासाठी विनवले.
"डेपो ला साहेबांला फोन केला आहे , ते गाडी सोडतील" हे मुल्ला साहेबांचे उदगार ऐकल्यावर जिव भांड्यात पडला.
८.०० ची गाडी ८:४५ ला आली. एव्हाना "इतक्या सकाळी कशाला उठवले अजुन झोपलो असतो", "तुला यायला उशिर झाला" अशा कुरबुरी सुरु झाल्या होत्या. अखेर सातारा - तेटली या बसमध्ये बसुन आमचा प्रवास सुरु झाला.सातारा शहरातुन बाहेर पडलो.बोगद्यापसुन उजविकडे वळ्ल्यावर कास पठाराकडे रस्ता जातो. रस्त्यात उजविकडे यवतेश्वरा चे देवस्थान लागते.तसेच डावीकडे सातारा शहर आणि उजविकडे श्री समर्थांच्या सज्जनगडाचेही विलोभनिय द्रुश्य दिसते. कास चे विस्तिर्ण पठार आणि त्यातुन जाणारा रस्ता हे सर्व स्वर्गवत होते. बामणोली ला जाणारा रस्ताही नागमोडी व दाट झाडांचा आहे.येथे आल्यावर हवा एकदम थंडगार झाली.समोर शिवसागरचा विस्तिर्ण जलाशय दिसत होता.

११:१५ ला बामणोली ला पोचलो.तिथे पोचल्यावर लोंच चे तिकिट काढले.प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे लाउंच चे भाडे होते. लौंच चालक श्री. सुभाष शिन्दे यांच्या आम्ही संपर्कात होतो.तिथले वनखात्याचे हवाल्दार बि के भोसले यांना भेटुन आमचा पुढचा कार्यक्रम सांगितला.त्यादिवशी वासोटा व नागेश्वर पाहुन अम्ही पलिकडे कोकणात चोरावणे या गावी उतरणार होतो.वासोटा हे राखीव अभयारण्य असल्यामुळे तेथे जायला वनखात्याची परवानगी घ्यावी लागते.सर्वांची नावे व फोन नं वन खात्याच्या ओफ़िसात द्यावी लागतात. प्रत्येकि २० रुपये शुल्क आकारले जाते.या सर्व बाबींचि पुर्तता केल्यावर ११:१५ ला वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या मेट-इंदवली या ठिकाणी जाण्यास निघालो.हा प्रवास सुमारे १ तासाचा आहे.

शिवसागराचे अथांग पाणी पाहुन समुद्राचाच भास होत होता.भोवतालच्या सह्याद्रिच्या सदाहरित पर्वतरांगा महाराष्ट्राच्या वैभवाची साक्ष देत होत्या.गर्द हिरवी वनराई पाहुन सर्वांचेच नेत्र सुखावले.पाण्यात अर्धवट बुडालेली झाडे खंबीरपणे पाय रोवुन उभी होती.पर्वतांचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब सुरेख दिसत होते.सर्व हौशि मित्रांनी फोटो काढण्य़ासाठी कैमेरे काढले आणि निसर्गाचे छायाचित्रण सुरु झाले.पुढे जंगलात जेवायला थांबणे शक्य नसल्याने सर्वांनी बरोबर आणलेल्या दशम्या , पराठे , पोळ्या , पिठ्ले यांवर ताव मारला.लौंच चे सुकाणू नियंत्रण करण्याची संधीही आम्हाला मिळाली.फोटो काढ्ण्याचे काम जोरात सुरु होते.फोटो काढ्ण्यासाठी सर्व एका बाजुला गोळा झाले की लौंच एका बाजुला कलायची व लौंचवाला ओरडायला लागायचा.लौंचला एक इंजिन असते आणि मागे पाण्यात बुडालेला पंखा असतो.इंजिन चालु केले की हा पंखा फ़िरतो त्यामुळे पाणी मागे ढकलले जाउन बोट पुढे जाते.पंख्याच्या विरुद्द बाजुला वजन वाढले कि हा पंखा पाण्यातुन उचलला जातो व बॊटीचा वेग कमी होतो.असे दोन तीन वेळा झाले आणि लौंचवाला ओरडायला लागला.अखेर १२:३० वाजता आमचा हा जलप्रवास संपला आणि आम्ही मेट-इंदवली या ठिकाणी पोचलो.
मेट-इंदवली गावात वनखात्याचे चेक-पोस्ट आहे.ज्यांना किल्ला चढणे शक्य नाही त्यांच्याकरता वासोटा दर्शन म्हणुन इथपर्यंत येता येते.वनखात्याचे गार्ड श्री.मुसळे यांना आम्ही गाईड म्हणुन बरोबर घेतले.पायात स्लीपर,हाफ शर्ट,हाफ चड्डी,कमरेला कोयता,डोक्यावर कोयना अभयारण्य असे लिहिलेली टोपी असा मुसळे काकांचा पोशाख होता.वय साधारण ६० च्या आसपास असेल. "जंगलात जळ्वा खुप आहेत,एका जागी जास्त थांबु नका,पाणथळ भागात जास्त वेळ थांबु नका" असे आधी आलेल्या गटाने सांगितले.मुसळे यांना बरोबर घेउन आमचे मार्गक्रमण सुरु झाले.पावलागणिक जंगलाचा दाटपणा वाढत होता.१५ मिनिटे चालल्यावर एक झरा लागला.तो ओलांडताना पाण्यात पाय बुडणार नाही याची काळ्जी घेतली.थोडे पुढे गेल्यावर हनुमान कट्टा लागला.सपाट रस्ता संपून चढण सुरु झाली होती.पाठीवरचे सामान ओझे वाटु लागले होते.त्याचबरोबर गास स्टोव्ह , भाजीपाला असलेली आणि पाण्याच्या बाटल्या असलेली
अशा ३ पिशव्या आम्ही आळीपाळीने वागवत होतो.चढताना प्रचंड दमछाक होत होती. पायवाट पावसामुळे निसरडी झाली होती.एखादातरी प्राणी बघायला मिळेल या आशेवर मी चालत होतो.जंगलात ठिकठिकाणी वन्य प्राण्यांची माहिती देणारे बोर्ड लावले आहेत.एका झाडावर बिबट्याने चढताना पडलेले ओरखडे दाखवले.सरळ्सोट वाढलेल्या झाडावर तो बिबट्या कसा चढला असेल याचे आश्चर्य वाटले.कदाचित झाडावरील माकडाची शिकार करण्यासाठी तो चढला असावा.

साधारण १ - १:३० तासांच्या पायपीटि नंतर डाविकडे वासोटा व उजवीकडे नागेश्वर असे लिहिलेली पाटी दिसली.आमचा प्लान सुर्यास्तापुर्वी नागेश्वर उतरुन जाण्याचा होता.त्यासाठि ५:०० वाजता तिथे पोचणे आवश्यक होते.डावीकडे वळुन नविन वासोटा किल्ल्याकडे जाण्यास निघालो.पुन्हा एक दमविणारी चढण होती.काही मित्रांनी भराभर चढता यावे म्हणुन आपल्या बागा जरा लांब दगडांमध्ये लपवुन ठेवल्या.मुसळे काका पुढे आणि मागे सर्व आम्ही असा जथ्था चालला होता.जसजसा किल्ला जवळ यावा तशी चढ्ण आणखीच वाढत होती.फ़र्स्ट गियर ला हाफ क्लच देउनही गाडी चढत नव्ह्ती. मागे पाहीले तर गर्द हिरवे दाट जंगल आणि त्यात शिरलेला शिवसागर जलाशय असे सुंदर द्रुश्य दिसत होते.शेवटी उजविकडे वळुन बालेकिल्ल्यात प्रवेश केला.समोरच हनुमानाचे देउळ आहे.उजवीकडे गेल्यावर शंकराचे मंदिर आहे.हे मंदिर अतिशय प्राचीन असुन आजही सुस्थितीत आहे.या पठारावर जवळजवळ आर्धा फ़ुट खोल असे खडडे होते.मुसळे काका म्हणले कि सकाळी एथे गव्यांचा कळ्प येउन गेलाय.हे त्यांच्या पावलांचे ठसे आहेत. गव्याचे वजन ३ टनांपर्यंत वाढते.त्यांची पावलेही तशीच वजनदार असणार.ढगाळ वातावरण असल्याने समोरच्या पर्वताचे व्यवस्थित दर्शन होत नव्ह्ते.त्यावर चरणारे गवे बर्याचदा वासोट्यावरुन दिसतात.
हनुमान मंदिरावरुन डावीकडे आले कि चुना व शिसे द्ळण्यासाठि वापरले जाणारे भलेमोठे जाते दिसते. त्यावेळि किल्ल्याची बांधणी करताना याचा उपयोग केला असेल.हनुमान मंदिराच्या मागे राजमहालाचे अवशेष आहेत.इमारती चा जोता आजही चांगल्या स्थितीत आहे.त्याकाळ्चे लोक किती एकनिष्ट होते याची प्रचिती येते.नाहीतर आजच्या काळातले ++++++ राज्यकर्ते. जोत्यावर उभे राहुन बघितले तर सर्वत्र गवत वाढलेले होते.त्यानंतर सुप्रसिध्द बाबु कडा पाहण्यास आम्ही निघालो.बाबु कडा हनुमान मंदिरावरुन १० मिनिटे अंतरावर आहे. बाबु कडा हा हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याचा लहान भाउ वाटतो.त्याचे भव्य , रौद्र व भीषण असे दर्शन मनात धडकी भरवते.या कड्यावरुन बहुदा वाराही घसरत असावा.पलिकडे भगवान परशुरामांनी वसविलेली कोकणभुमी आहे.जुना वासोटाही समोर दिसतो.येथे जाण्याची वाट अवघड व कमी वहिवाटीची आहे.
याची कथा अशी की ईंग्रजांच्या काळात ताई तेलिण हि स्त्री येथे किल्लेदार होती.ईंग्रजांच्या कडुन बापु गोखल्यांनी या किल्ल्यावर हल्ला केला.सहा महिने ताई तेलिणी ने हा किल्ला शर्थिने लढवला.परंतु शेवटी ईंग्रजांच्या सैन्यबळापुढे तिला हार मानावी लागली.किल्ला पड्तो आहे हे कळ्ताच तिने या कड्यावरुन उडी मारुन प्राणार्पण केले.तेव्हाचे तिचे उद्गार प्रसिध्द आहेत. ताई तेलिणीला मनोमन साष्टांग दंडवत घालुन आम्ही किल्ला उतरु लागलो.

नागेश्वर फाट्याकडे आलो तेव्हा दुपारचे ३:३० वाजले होते.सर्वांनी भराभर चालणे सुरु केले.पुन्ह: चढ-उतार सुरु झाला.थोडे जंगल संपल्यावर डोंगराच्या धारेवरती आलो.धार म्हण्जे दोन डोंगरांना जोडणारी अरुंद वाट.हि वाट अतिशय अवघड आहे.डावीकडे खोल दरी आणि पायाखाली निसरडे झालेले गवताळ पायवाट.सर्वजण काही न बोलता सावधपणे चालत होते. सुमारे दोन तास चालल्यावर नागेश्वरची गुहा दिसली आणि सर्वांनी सुट्केचा निश्वास सोडला.सलग पाच तास दमछाक करणारी पायपीट संपली होती.मुसळे काकांना येथे आम्ही निरोप दिला, आणि ते या भयानक जंगलाध्ये अंधाराच्या आत कसे पोचतिल या विषयी आश्चर्य व्यक्त केले.
गुहेत जाण्याआधी उजवीकडे नागेश्वर कुंड आहे.तिथले पाणी पिण्यास योग्य आहे. इथे हातपाय धुतले , बाटल्या पाण्याने भरल्या.
त्यावेळी प्रशान्त,उज्वल,विशाल यांचे सूर्यास्ताचे छायाचित्रण चालु होते.६:३० च्या सुमारास गुहेत पोचलो. अंधार असल्याने शिवलिंगाचे दर्शन झाले नाही.सामान,बुट व्यवस्थित ठेवले.रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरु झाली.तांदुळ,मीठ,मसाला,कांदे,पातेली इ गोष्टी बाहेर आल्या.भाजी चिरण्याचे काम सर्वांनी वाटुन घेतले.मेणबत्त्या व टोर्च यावर सर्व काम सुरु होते.स्वयंपाकी नंदु ला सर्वजण सल्ले देत होते.मसाला कमी घाल,शेंगदाणे जास्त घाल,पाणी जास्ती नको,मीठ बरोबर घाल, हालव अशा आवाजांनी ती गुहा दणाणुन गेली होती.८:०० वाजता पुलाव तयार झाला व सर्वांनी पोटभर जेवण केले.जेवण करुन भांडी आवरली.त्यानंतर लघुशंका करुन आल्यावर सर्वांनी झोपण्याकरता पथार्या टाकल्या.समोरचे डोंगर धुक्यात हरवुन गेले होते.दुर लांब खाली चोरावणे गावातले दिवे दिसत होते.दिवसभरच्या अनुभवांची चर्चा करत ९:३० ला झोपलो. कायद्याने नागेश्वर ला राहण्यास परवानगी नाही.पण अंधारात हा प्रचंड कडा उतरणे अशक्य होते.शिवाय खाली गाव किती लांब आहे याचा अंदाज नव्ह्ता.त्यामुळे गुहेत राह्ण्याचा निर्णय घ्यावा लागला. माणशी रु. ५०००/- इतका दंड वनखाते लावते.शिवाय कायदेशिर कारवाई होते ति वेगळिच. ईथे राहणे हे कायद्याच्या विरुद्ध होते. तसे पुन्हा कोणी करु नये.
पहाटे ५:३० ला जाग आली.पुढचा प्रवास नागेश्वर;चोरावणे;चिपळुण;पूणे असा होता.शौचमुखमार्जन करुन नरेंद्र ने चहा उकळ्त ठेवला.चहात पावडर जरा जास्तच पडली. जवळ्ची आख्खी दुधाची पावडर ओतली तरी चहाचा रंग बदलेना.शेवटि तसाच ब्लाक टि पिउन आम्ही गुहेचे व गुहेतील प्राण्यांचे फोटो काढले.
सुर्योदय झाल्यावर शिवलिंगाचे दर्शन घेतले. नागेश्वर हे स्वयंभु शिवलिंग आहे. आश्चर्य असे कि डोंगरातुन बरोबर शिवलिंगावर बारा महिने जलाभिषेक होत असतॊ.हे याचे वेशिष्ट्य आहे.
सर्वांनी सामान बांधले व बुट घालण्याआधी घंटांच्या गजरात शंकराची आरती म्हणली.छ्त्रपति शिवराय व भवानी मातेच्या जयघोषात आम्ही उतरायच्या वाटेला लागलो.उतरण्याकरता ४० मिटर मागे यावे लागते,तेथे एक उंबराचे झाड आहे व तेथुनच खाली उतरायला रेलिंग आहे.उतरताना धुके होते व कोवळा सूर्यप्रकाश होता.कोवळी किरणे धुक्यात पडल्यामुळे धुके सोनेरी झाले होते.राजीव व हर्षल यांच्या कैमेर्याने ते अचुक टिपले.हे धुके बघण्याचा आनंद केवळ अवर्णनीय होता.रेलिंग संपल्यावर धोकादायक उतरण सुरु झाली.तोल सांभाळ्ण्यासाठी गावकर्यांनी व ट्रेकर्स नी साखळ्या बांधल्या आहेत.त्यांचा खुप उपयोग झाला.खडकावरुन पावसाचे पाणी / दंव साठ्ल्यामुळे खुप शेवाळे साठले होते.तेथे पायच काय पण हातही थांबत नव्हता.या कठिण उतारावर आम्ही संथ व काळ्जीपुर्वक चालत होतो.एकाने पुढे जायचे आपली ब्य़ाग तिथे ठेवायची व बाकीच्यांचे सामान ,स्टोव्ह इ, पुढे पास करत राहायचे असे करत आम्ही खाली उतरत होतो.३-४ अशी वळणे पार केल्यावर उतार कमी झाला व उभे राहुन चालता येउ लागले.वाटेत खेड चिपळुन हुन येणारी मंडळी भेटली.आमच्यातला जवळ्जवळ प्रत्येक जण "अजुन किती चालायचे आहे" असे त्यांना विचारत होता.आता उतार संपुन डोंगरांना ’बायपास’ करत आमचा प्रवास सुरु होता.कोकणातील दमट हवा जाणवु लागली होती. लाल मातीत मळ्लेला रस्ता दुर दिसत होता.२-३ डोंगर वळ्णावळ्णाने पार केल्यावर उतार लागला.सूर्य हळुहळु डोक्यावर येत होता.. शैलेश सर्वांना लेमन च्या गोळ्या देउन त्यांची तहान भागवत होता.चिर्यात तयार केलेल्या पायर्या लागल्या.प्रचंड तहान लागली होती.
कुठे एखादा झरा मिळाला तर बरे होइल असे वाटत असतानाच उजवीकडे पाण्याचा खळखळ असा आवाज ऐकु झाला.
क्या देता नही खुदा , फ़र्मानेवाला चाहियें ! याचा अनुभव आला. पण पाणी मात्र दिसत नव्ह्ते. तो आवाज ऐकताच आमचा वेग वाढला व ओढ्यापशी येउन थांबलो. घाट्माथ्यावरुन आम्ही सुरक्षित कोकणात पोचलो होतो.बर्याच वेळ लागलेली तहान ओढ्याच्या पाण्याने शमवली.विशाल , नरेंद्र , उज्ज्वल, प्रशांत इ. स्वच्छ्ताप्रिय व्यक्तिंनी साबण लावुन आंघोळ केली.व बागेतले नविन कपडे घातले.आम्ही मात्र आहे त्याच परिस्थितीत ओढ्याकाठी पहुडलॊ.अजुन चोरावणे गाव जेव्हा ५, ६ किमी आहे असे कळ्ले तेव्हा सर्वांची पुन्हा फ़ाटली.भर उन्हात उघड्याबोडक्या रस्त्यावरुन १ तास तरी चालायला लागनार होते.
पोहे करण्याचे साहित्य पिशवीत शिल्लक होते. सर्वानुमते पोहे करण्याचे ठरले.अभिजित हा उत्साही युवकाने स्टोव्ह घेउन ओढ्यातिलच एका दगडावर ठाण मांडली.पोहे धुतले, मिर्च्या चिरल्या,फोडणी तयार झाली.त्याचवेळी प्रशांत या बालकाने मैगि पहिजे असा हट्ट नरेंद्र जवळ धरला.नरेंद्र ने दगडांची चुल मांडुन त्यावर काट्याकुट्याच्या सहाय्याने जाळ केला.त्यावर मैगि उकळ्त ठेवले.तेव्ह्डयात दुरुन कोणत्यातरी गाडीचा आवाज आला.जवळ आल्यावर कळ्ले कि तो ट्रॊलि ट्रॆक्टर होता.पळ्तच जाउन त्या ट्रॆक्टर वाल्याला निघायला किति वेळ आहे ते विचारले. बरोबर आणलेली खडी टाकुन तो ट्रेक्टरवाला चोरावणे गावात जाणार होता.मला अत्यानंद झाला.
मी भराभर मित्रांना सामान आवरण्याची विनंती केली.ट्रेक्टरवाला चोरावणे गावात अम्हाला सोडावयास तयार होता.जमेल तेवढे सामान एका पिशवीत भरले.ब्यागा व इतर पिशव्या ट्रोलीत नेउन ठेवल्या.पोहे व मैगी ट्रोलीतच खाउ असा निर्णय घेऊन ट्रोलीत बसलॊ.ट्रोलीत बसुन खुप धक्के बसत होते.तरिही भुक लागली असल्याने हाताचा चमचा करुन मेगि खात होतो.काहिंना पोहे व काहींना मैगी लांब पडत असल्याने अखेर दोन्ही एकत्र केले.ट्रोलीत खुप धक्के बसत असल्याने हाता तोंडा ची गाठ पडणे अवघड झाले होते.पण तरीही भुक जबरदस्त लागली होती.एका नदीपाशी ती गाडी येउन थांबली.इथपर्यंतच ती येणार होती.नदीपाशी उतरलॊ,जवळ्ची भांडी ताट्ल्या चमचे स्वच्छ धुतले.पलिकडे गुळ्गुळित धोंड्यांवर पाठ टेकवली.खुप बरे वाटले.पुढे चोरावणे गाव येइ पर्यंत चालणे बाकी होते.सुमारे २० मिनिटे चालल्यावर चोरवणे गाव लागले. तिकडून १.३० वाजता  चिपळुण ची गाड़ी मिळाली.तिकडून पाटण,उंब्रज,सातारा असे मजल दरमजल करत रात्री ११ वाजता पुण्याला पोचलो.

फोटो

No comments:

Post a Comment